कवितेचा उत्सव
☆ दीपोत्सव करीत जा.. ☆ श्री आनंदहरी ☆
शोध तू तुझीच आता, प्रकाशाची वाट रे
चाल तूच पुढे पुढेच, ध्येय तुझेच गाठ रे
उजळीत जा भवताला स्वयंदीप चेतवुनी
तिमिर जरी दाटला, पथावरी घनदाट रे
मातीचे मान ऋण, घे भरारी नभांगणी
अहंकार स्पर्शू नये, भेटले जरी भाट रे,
संकटांचा सागर ये, वाट तुझी रोखण्यास
नको थकू, नको खचू, तू गाठ पैलकाठ रे
दीप दीप चेतवीत, दीपोत्सव करीत जा
येती पथिक मागुती, देई तू मळवाट रे
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈