श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ आयुष्याचा उत्सव व्हावा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
आयुष्याचा उत्सव व्हावा फुलून यावे गाणे
ध्यास असावा नित नूतनाचा उगा कशाला झुरणे
लावीत जावे मनामनातून आनंदाचे झाड
धडपडताना जपत रहावे मूल मनातील द्वाड.
कशास बुरखे विद्वत्तेचे कशास आठ्या भाळी
वाचियले ते कुणी कधी का लिहिले काय कपाळी
फुलवित जाव्या चिवटपणाने स्वप्नफुलांच्या वेली
उगारील जो हात,तयाच्या हातावरती द्यावी टाळी.
असतील,नसतील सुंदर डोळे;तरी असावी डोळस दृष्टी
ज्याच्या त्याच्या दृष्टीमधूनी दिसेल त्याची त्याची सृष्टी
शोधित असता आनंदाला कधी न व्हावे कष्टी
मर्म जाणतो तोच करीतसे सुख सौख्याची वृष्टी.
वाट वाकडी असली तरीही सरळ असावे जाणे
काट्यामधूनी,दगडामधूनी जावे सहजपणाने
शोधित जाता ताल सुरांना सुचतील मधुर तराणे
आयुष्याचा उत्सव व्हावा फुलून यावे गाणे.
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈