प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर
कवितेचा उत्सव
☆ दिवे…… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆
ती ;
पहाटेच्या अंधारात
शेणानं सारवून अंगण.
शेणानंच साकारलेल्या
शेणगोळ्याच्या गवळणीतले
तिच्या हृदयातून उमटलेले
अंगणातले सौंदर्य,
आणि
संस्कृतीचे धागे जतन करत रहायची .
त्यातच खोलगटलेल्या
दिव्याच्या प्रकाशात
तिचं समाधान लकाकून जायचं.
अंगणभर पसरलेल्या,
अंधुकशाच प्रकाशात
तिची दिवाळी उजळत रहायची.
अंगणातल्या चुलीवर पाणी तापवायची.
लेकराबाळांना अंघोळ घालायची.
नव्या धडूत्यांच्या सुवासात
नातवंडं भरून पावायची.
तिच्या हातच्या कानवल्यातलं सारण
असं टचटचीत भरून सांडायचं अंगणभर.
फुलबाजांच्या सुरसुऱ्यात,
तिची दिवाळी
अशी प्रत्येक वर्षी खुलून यायची.
………….
आज
थरथरत्या हातांनी
आणि
खोल गेलेल्या डोळ्यांनी,
वाट पहात
ती ;
अंगण न उरलेल्या
रित्या घरात
उजळवत राहतेय
आता ;
तिच्यापुरतेच दिवे …!
© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर..
बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली
मो ९४२११२५३५७
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈