श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
☆ कवितेचा उत्सव ☆ बहिणीची माया……. ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
आली दिवाळी भाऊराया
वाटते पडावे तुझ्या पाया
विदेशात तू ,विलासात तू
तरी चिंता करते वेडी माया
पाठविली तू भेटवस्तू जी
पडून आहे कोपऱ्यात ती
नाही मजला ओढ तयाची
आस मनी तुज बघण्याची
बसवून पाटावरी तुजला
ओवाळावे वाटे रे मजला
नारळ फळांनी भरून ओंजळ
भाळी तुझ्या लावावे चंदन
आप्त स्वजन मिळून सारे
करावी वाटे मज दंगल
पण मोठे होऊन बसले सारे
मोद खरा विसरलो ना रे
आठविते रे ती दिवाळी
बालपणीची आनंदाची
नव्हता पैसा नी फटाके
मौज तरीही रे खूप वाटे
झाले सगळे सधन आता
निवडल्या स्वार्थाच्या वाटा
सुखाचा तू रे संसार थाटला
पण जिव्हाळा बहिणीचा
नाही रे आटला…..,नाही रे आटला ……
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
अप्रतिम खूप सुंदर वेड्या बहिणीची वेडी माया आपुलकी बहिण-भावाचा, आप्तेष्टांचा जिव्हाळा बालपण गरीबी अर्थपूर्ण वाक्य रचना??
आज कुठे तरी हे सर्व इलेक्ट्रॉनिक प्रसाधना मुळे लोप पावत आहे असं वाटतं