श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ भक्तीरचना ☆ श्री सुहास सोहोनी ☆

भक्तीरचना : पंढरी माझ्या ह्रदयी ग

??

पंढरिचे चैतन्य लुटोनी

अगणित झाले पावन ग ।

रिक्तहस्त मी माझ्यासाठी

विठ्ठल उरला नाही ग ॥

?

अंश अंश नेला सर्वांनी

स्तिमित जाणिवा झाल्या ग ।

बधीर मानस उरले केवळ

विठ्ठल कोठे गेला ग ॥

?

तुळशीहारे कंठ पळविला

तुकया मस्तक घेई ग ।

हस्त कटीवर विसावलेले

डोंगा चोखा नेई ग ॥

?

नेत्र गवसले ज्ञानीयासी

ज्ञानचक्षु ते झाले ग ।

गोरोबाच्या संगे गेला

होउनि वेडा कुम्हार ग ॥

?

पायरिचा पाषाण मज हवा

नाम्या हटून बसला ग ।

नामाचा व्यवहार करोनी

धन्य नरहरी झाला ग ॥

?

सहज लाभता माळपदक तिज

जनी हासली गाली ग ।

आळ चोरिचा खोटा स्मरता

अश्रु दाटला नेत्री ग ॥

?

दामाजीने  हरिनामाची

कोठी उघडी केली ग ।

युगायुगांची उभी पाउले

पुंडलिकाघरी गेली ग ॥

?

मळा भक्तिचा जाइ सावता

घेउन अपुल्या गांवी ग ।

उरला विठ्ठल लुटण्या जमला

वारकर्‍यांचा मेळा ग ॥

?????

तिळातिळाने विरघळणारा

विठ्ठल मी देखिला ग ।

बांध फुटोनी वाहु लागल्या

नयनांमधुनी सरिता ग ॥

?

एकटीच मी राउळि बसले

बाकी शून्य पसारा ग ।

बघवे ना गाभारा पोकळ

थकले डोळे मिटले ग  ॥

?

जाणिव नेणिव बोथट झाली

भानच नुरले कसले ग ।

अंतर्यामी सूर उमटला

मनोमनी आकळला ग ॥

?

सूर बोलला घेई समजुन

कशी बावरी झालिस ग ।

चराचरी मी भरुन राहिलो

लुप्त कसा मी होइन ग ॥

?

ज्याने त्याने नेला विठ्ठल

दशांगुळे तरि राही ग ।

डोकावुनिया हृदयि आपुल्या

अनुभुति त्याची घेई ग ॥

?

सहजपणाने स्वहृदयांतरि

प्रथमच मी देखिले ग ।

सहस्र रश्मी तेजाळुनिया

डोळे माझे दिपले ग ॥

?

हळू हळू साकार होउनी

विठ्ठलाकृती सजली ग ।

आश्चर्याला सीमा नाही

वैष्णव जमले भवती ग ॥

?

चंद्रभागेचा कांठ होउनी

हृदयकमल मम फुलले ग ।

दिंड पताका गर्दी उसळे

अबिर गुलाला उधळति ग ॥

?

संत वारकरि हासत नाचत

नृत्य कीर्तनी रमले ग ।

त्यांच्या संगे विठू सावळा

भान हरपुनी नाचे ग ॥

?

दर्शन घडले विठुरायाचे

आस मनीची फिटली ग ।

अंतरिचा संवाद संपला

भान जगाचे आले ग ॥

?

माझे होते माझ्यापाशी

परी ठाउके नव्हते ग ।

आता उमगे वसली आहे

पंढरि माझ्या हृदयी ग ॥

पंढरि माझ्या हृदयी ग ॥

पंढरि माझ्या हृदयी ग ॥

 

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments