स्व .मनमोहन नातू
कवितेचा उत्सव
☆ ती पहा,ती पहा….☆ स्व. मनमोहन नातू ☆
ती पहा,ती पहा बापूजींची प्राणज्योती
तारकांची सुमनमाला देव त्यांना वाहती
झुंजला राजासवे हा रंगला रंकासवे हा
पेटता देहेहि आता दिव्यता दावुनी जाती.
चंदनाचे खोड लाजे हा झिजे त्याहूनीही
आज कोटी लोचनींच्या अश्रुमाला सांडिती
पृथ्वीच्या अक्षांशी लाली पृथ्वीच्या रेखांशी लाली
चार गोळ्या ज्या उडाल्या दशदिशांना कापिताती
नाव ज्यांचे ऐकुनिया थरकती सिंहासने
ना धरी तलवार हाती हा अहिंसेचा पुजारी
सत्य मानी देव आणि झुंजला खोट्यासवे
मृत्युच्या अंतीम वेळी नाव रामाचे मुखी.
सिंधु,गंगा आणि यमुना धन्य झाली अस्थिंनी
राख तुझी भारताच्या तिलक झाली रे ललाटी.
– स्व मनमोहन नातू
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈