श्री उदय गोपीनाथ पोवळे
कवितेचा उत्सव
☆ शाळेतले बालपण ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
पाटी आणि पेन्सिल
हेच होते सोबतीला
मित्र असे साथीला
शाळेतल्या गमतीला
निष्पाप त्या मनावर,
टेन्शन असे गृहपाठाचे
उत्तर मिळे चावून
टोक त्या पेन्सिलचे
दिवाळीच्या सुट्टीतही
गृहपाठ हा असायचा
पहिल्या दोन दिवसातच
उरकून तो टाकायचा
क्लास नाहीतर शिकवणी
शाळे शिवाय असायची
आमच्यासारख्या मुलांना
कधी गरजच नसायची
गाढव , ढ शब्दाने
बहुमान खूप मिळायचा
लाज, लज्जा, शरम
ह्यांचा मागमूसही नसायचा
उठाबशा, ओणवे रहाणे
हे कायमच असायचे
हातावर पट्टी घ्यायला
डोळ्यांत पाणी नसायचे
नविन पुस्तक, गाईड ह्यांची
वानवाच घरी असायची
सेकंड हँड पुस्तकांनीच
अभ्यासात प्रगती व्हायची
पिंपळ पान मोरपिस
पुस्तकात कायम असे
बालपणीचा तो सुंदर
असा खजिनाच भासे
खाकी दप्तर अथवा पेटी
सोबती शाळेत असायचे
वह्या, पुस्तक, चिंचा, आवळे
एकत्र त्यात नांदायचे
अर्ध्या तासाचा डेली सोप
दफ्तर भरणे असायचा
प्रायोजका शिवाय तो
रोजच करायला लागायचा
सायकल भाड्याने घेऊन
स्वस्त्यात आनंद मिळायचा
मित्राला मागे बसवून
आनंद द्विगुणित व्हायचा
डब्यातली मायेची पोळीभाजी
मित्रांत वाटून खायची
पिझ्झा नूडल्स समोस्याची
ओळखच आम्हाला नसायची
बाईना आणि सरांना
नमस्कार रोजच असायचा
टोपण नावे ठेवले तरी
त्यांना मान हा मिळायचा
नापास झालेली मुले
त्याच वर्गात शिकत होती
शिक्षणात मागे आहोत
म्हणून आत्महत्या करत नव्हती
बाहेरच्या जगात उडायला
शाळेनीच आम्हाला शिकवले
पडलो तरी उठायला
मैदानी खेळातून उमजले
कोणाचेच वाईट झाले नाही,
सगळेच मस्त कमवत आहेत
नापास झालेलीही मुलं आता
राजकारणात चमकत आहेत
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈