सौ. विद्या वसंत पराडकर
कवितेचा उत्सव
☆ ||श्रावण गीत|| ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆
चल चल ग सखी,जाऊ अंगणात
श्रावणाचे ऐकाया गीत
मोत्यासम या जलबि॑दूतुनी
हिरव्या हिरव्या तरूपर्णातुनी
खळखळणाऱ्या सरितांमधूनी
दाही दिशातुनी गर्जे गीत
वनश्रीचा चुडा हिरवा
दाट धुक्यातून गंधित मरवा
सुमंगलाची सुंदर प्रभात
चैतन्याचे गाई गीत
तेज आगळे प्रसन्नतेचे
वसुंधरेच्या नवयौवनाचे
दिव्य प्रभेच्या लावण्याचे
इंद्रधनुही गाई गीत
अमृतमय या जलधारांनी
राणी वसुधा चिंब भिजोनी
जणू न्हालेली ही सुंदर रमणी
वीज तेजस्वी गाई गीत
अशी रूपसंपन्न धरा सुंदर
अंबर धरती मीलन मनोहर
नाचे गाई मुरली मनोहर
विश्र्व कल्याणाचे गाई गीत
© सौ. विद्या वसंत पराडकर
पुणे.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈