सौ. सुचित्रा पवार
कवितेचा उत्सव
☆ नभीचा चंद्रमा ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
नभीचा चंद्रमा ग सखे घरामंदी आला
कसं सांगू सये जीव येडापिसा झाला …धृ
उतरल्या चांदण्या , घर गेले उजळून
मंद मंद हसे चांदवा, गेले मी लाजून
अमृताचा स्पर्श त्याच्या ग नजरेला
कसं सांगू …..
गूज मनीचे सांगण्या, तो कानाशी लागला
शांत शांत समईही हसे आज त्याला
चूर चूर मी गाली,लालीमा ग आला
कसं सांगू….
थांबली आता कुजबुज रातव्याची
वाढली गती अशी कशी श्वासांची
असा कसा चांदणसाज देऊनी तो गेला?
कसं सांगू सये…
रातराणी बहरली येता मला जाग
जादू कशी ही घडे सये तू मज सांग
नयनी त्याचे रूप ,चांदणं हृदयी गोंदून गेला
कसं सांगू सये…
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
सुंदर भावपूर्ण रचना