श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ वेड…. ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
तुझ्या प्रीतीमुळे हेही, घडाया लागले आता
मला ही प्रेम गे माझे, मिळाया लागले आता
कसे या वेड पाचोळ्यास लागे र्भिभिरायाचे
मनी ते वादळांसाठी झुराया लागले आता
मला ग्रीष्मातही या पावसाने चिंबसे केले
तुझे ते भेटणे जेंव्हा, स्मराया लागले आता
तुझ्याशी बोलताना शब्द जेंव्हा टाळले काही
कळाले वेगळे नाते, जडाया लागले आता
जरा मागीतला होता, उठाया हात मी त्यांचा
कडेने ओळखीचेही, पळाया लागले आता
जगाची रीत ‘ही ‘जेंव्हा, आचरू लागलो मीही
जगाशी याच माझेही, जमाया लागले आता
लपायाच्या दडायाच्या जश्या का पाडल्या भींती
पणानी प्राण हे माझे, लढाया लागले आता
कुणाचे कोणही नाही, स्मशानी हे कळू येते
शवानी पेट घेता ‘ते’, वळाया लागले आता
रडायाचा जुना त्यांचा, असे रे शौक बाजारू
सुखांनी नाहताना ते, कण्हाया लागले आता
जरी ना माणसांना या, यशाची कौतुके माझ्या
तरूंचे चौघडे रानी, झडाया लागले आता
***
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈