सौ. सुचित्रा पवार
कवितेचा उत्सव
☆ मी शबरी ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
धन्य मी शबरी भिल्लाची
चरण क्षाळीते श्रीरामाची
झाडलोट करुनी कुटीची
वाट सुशोभित आगमनाची
नाजूक चरणे प्रभूंची
चरण क्षाळीते श्रीरामाची
वनमाळांची घेऊनिया परडी
कंदमुळांची चाखून गोडी
भेट साधीच अर्पायाची
चरण क्षाळीते श्रीरामाची
चव उष्टावल्या बोरांची
माला सुगंधी पुष्पांची
मज न ठावे आवड देवाची
चरण क्षाळीते श्रीरामाची
युगेनयुगे वाट पाहून प्रभूची
थकली कुडी शबरीची
आस एकच प्रभुभेटीची
क्षाळीते चरण श्रीरामाची
नको मज देवा काही आता
पावन कर झोपडी जाता जाता
विनंती भोळ्या शबरीची
क्षाळीते चरण श्रीरामाची
धन्य मी शबरी भिल्लाची
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈