सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
कवितेचा उत्सव
☆ मन राऊळी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
मनाच्या राऊळी, विठ्ठल झाला हो जागा !
नाही पंढरी, मंदिरी, आहे तुझ्याच अंतरंगा!
मनाच्या राऊळी, घंटानाद होई पहाट प्रहरी!
मनातील विठ्ठला संगे, करू पंढरीची वारी !
वाळवंटी चंद्रभागेच्या, वारकरी गर्दी ना करे!
विठ्ठलाच्या डोळ्यातून, विरहाचे अश्रू झरे!
भक्तगण झाला, माझ्या संगतीला पारखा!
अश्रुंनी भिजला, भक्त पांडुरंगाचा सखा!
रोगराईने केली भक्त गणात दूरी दूरी!
अंतरीच्या ओढीने, भक्त विठ्ठला साठी झुरी!
विठ्ठल म्हणे भक्ता, नाही तुझ्या माझ्यात अंतर!
तुझ्या मनाच्या राऊळी, असे मी निरंतर!
© सौ. उज्वला सहस्रबुद्धे
वारजे, पुणे (महाराष्ट्र)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈