सौ. विद्या वसंत पराडकर
कवितेचा उत्सव
☆ संमेलन ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆
रजनी देवीच्या रंग महाली
वृक्षलतांचे संमेलन भरले
संमेलनाला आगळा रंग चढे
संमेलनाला वेगळा रंग चढे
मोहरलेला आम्रवृक्ष हा
गुपित सांगे कानात
मीच फळांचा राजा
सांगे अभिमानात
गगनासम हा उंच शेवगा
उभा कसा हा डौलात
शीतल छाया देतो समान
कडूनिंब सांगे तो-यात
दाराजवळील चमेली
हात जोडून स्वागत करी
रातराणीचा सुगंध सांगे
मी सर्वा बेहोश करी
सुवर्ण चंपक गर्विष्ठ कसा ?
तोरा सांगे श्रीमंतीचा
फुलांचा राजा दावी रुबाब
गुलाबी गुलाबी सौंदर्याचा
हिरव्या साडीला जांभळे बुट्टे
जांभळी उभी डौलात
प्रसन्न वदने तेज विराजे
जाई, जुई नाचती तालात
धुंद सायली आणि बकुळी
नाचनाचुनी अखेर दमती
निशीगंधाचे सुस्वर गान
तन मन धुंद करती
सप्तरंगाचा गोफ विणीला
वृक्ष लतांच्या संमेलनाने
गगन ठेंगणे हो निशादेवीला
आगळ्या, वेगळ्या प्रसन्नतेने
इतक्यात काय झाले ?
रविकिरणांचे झाले आगमन
पाहूनी हर्षित कुंदकळ्या
प्राजक्ता ने सडा शिंपिला
वसुंधरेच्या घाली गळा
© सौ. विद्या वसंत पराडकर
पुणे.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈