भास्कर रामचंद्र तांबे
☆ रिकामे मधुघट…. ☆ भास्कर रामचंद्र तांबे ☆
मधु मागशि माझ्या सख्या ,परी
मधुघटचि रिकामे पडती घरी /ध्रृ/
आजवरी कमळांच्या द्रोणी
मधु पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पूर्विची स्मरोनी,
करि रोष न सखया,दया करी //1//
नैवेद्याची एकच वाटी
अता दुधाची माझ्या गाठी ;
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणी कशीतरी //2//
तरूण-तरूणिंची सलज्ज कुजबुज,
वृक्षझ-यांचे गूढ मधुर गूज,
संसाराचे मर्म हवे तुज,
मधु पिळण्या परी बळ न करी ! //3//
ढळला रे ढळला दिन सखया !
संध्याछाया भिवविती ह्रदया,
अता मधूचे नाव कासया ?
लागले नेत्र रे पैलतिरी //4//
– भास्कर रामचंद्र तांबे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मला भावलेले ह्रदयस्पर्शी काव्य.