☆ कवितेचा उत्सव ☆ माझ्या राजा हास रगड ☆ श्री प्रकाश लावंड ☆
( ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांच्या “माझ्या मनात बन दगड” या कवितेचा आधार घेऊन केलेली ही रचना.)
हे रान खडकाळ आहे
नांगरटी शिवाय मेहनती शिवाय
पावसा शिवाय खतपाण्या शिवाय
गाड माजणारं हे कुसळ
उचल नांगर लाव फाळ
घेऊ नकोस मागं पाय
नांगरून काढ काळी माय
ऐन उन्हाळ्यात लागंल धाप
मुक्या जीवांना ही होईल ताप
तोड झुडपं उचल दगड
हा रस्ता साधा सरळ आहे
पण उटी लागली तर करळ आहे
करू नकोस आक्रोश
घशाला पडेल शोष
चाड्यावर मूठ धर
बियाण्याची सोड धार
म्हणून म्हणतो जुंप औत
सांभाळ सांभाळ आपली पत
राबणाऱ्या राबशील जरी
कष्टताना दमशील जरी
पेरणाऱ्या पेरशील जरी
धान्याच्या राशी येतील घरी
मान डोलवित म्हणू नको हो हो
आसूड फरकारीत तयार हो
हा धंदा सरळ आहे
पिकेल खंडोगणती माल
आढ्यापर्यंत जाईल पोत्यांची ठेल
तुझा माल तुझा तू वाली
तुझ्या कष्टाची लाव बोली
मध्यस्थांचा होऊन काळ
हुसकावून लाव सारे दलाल
कस कंबर लाव लंगोट
झगड आता झगड झगड
यश मिळेल तुला रगड
बळीराजा बन धगड
© श्री प्रकाश लावंड
करमाळा जि.सोलापूर.
मोबा 9021497977
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈