प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर
कवितेचा उत्सव
☆ मोळी….! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆
चर चर कापणाऱ्या
ऊसाच्या पाल्याची सल
सर्वांगभर घेऊन
तो;
कडाक्याच्या थंडीत
ऊसतोड करत,
गारठलेल्या कुटूंबाचा
असा पालापाचोळा घेऊन
ऊसाच्या फडात
जगवतोय लेकरंबाळं.
पिळवटलेल्या शरीरानं
मोळ्या बांधत
कारखानदारी जगवता जगवता
आयुष्याचं चिपाड बनून जातोय.
त्याची वंशावळ
एक दोन कोयत्याच्या
मजूरीसाठी
आयूष्यभर
ऊसाचे फड तुडवतेय.
आणि
मुकादमाची उचल
फेडता फेडता
त्याच्या आयुष्याचीच
अशी
मोळी बनून जातेय….!
© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर..
दि.२२।१२।२०२१
बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली
मो ९४२११२५३५७
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈