कवितेचा उत्सव
☆ काळजात थिजले काही ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(वृत्त : लवंगलता)
मात्रा : ८+८+८+४
काळजात थिजले काही,ती झुळझुळ आता नाही
अस्तंगत झालो आहे , ती ज्योत जागती नाही !…
एकांती हलती फांद्या , पाखरांविना ही घरटी
निष्पर्ण जाहलो केव्हा,हे मलाच कळले नाही !
आणावे कोठून रक्त , ही मशाल जगवायाला…
ती रक्तचंदनी धारा,प्राणातुन वाहत नाही !
ही वाट कुण्या तीर्थाची,मी कशास चालत आहे?
हे उगीचतेचे ओझे , पांथस्था झेपत नाही !…….
जखमांचे क्रंदन शमले,दुःखांचे सरले चिंतन
ती तप्त मनस्वी मुद्रा,जगण्यावर उरली नाही !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈