सौ. स्वाती रामचंद्र कोरे
कवितेचा उत्सव
☆ शब्द माझे सोबती होतात… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆
भजनातून भगवंतापर्यंत नेतात
टाळ मृदंगाच्या तालावर डोलतात
गीत सुरेल बनून ओठी येतात
शब्द माझे..सोबती होतात.
काळजात रुतलेल्या भावनांना
अबोल झालेल्या त्या हुंदक्यांना
हळुवार बोलते करून जातात
शब्द माझे..सोबती होतात
आधाराच्या शब्दांनी हातात हात देतात
आशीर्वादाच्या सुमनांनी ओंजळ भरतात
अडीच अक्षरांनी जगणे गंधित करतात
शब्द माझे..सोबती होतात
कधी मान देतात,अपमान ही करतात
जखमेवरचा ढलपा काढून मोकळे होतात
कधी मलम होऊन अलवार फुंकर घालतात
शब्द माझे…सोबती होतात
ज्ञानेश्वरीचे ओवी,कबिराचे दोहे
नाथांचे भारुड..गीतेचा अध्याय होतात
जगण्यास नवीन दिशा देतात
शब्द माझे..सोबती होतात
प्रेमात पडायला शिकवतात
जगण्याचा आनंद देतात
शब्दसरीत न्हावूनी मने तृप्त होतात
शब्द माझे..सोबती होतात
शब्द माझे..सोबती होतात
© सौ. स्वाती रामचंद्र कोरे
भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली
मो.9096818972
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈