सौ. गौरी सुभाष गाडेकर
संक्षिप्त परिचय
सौ. गौरी सुभाष गाडेकर (पूर्वाश्रमीची कु. उषागौरी मधुसूदन नाडकर्णी )
शिक्षा : बी एस सी, एल एल बी (जनरल ), पी जी डिप्लोमा इन ट्रान्सलेशन.
व्यवसाय :‘बँक ऑफ इंडिया ‘त अधिकारी. आता स्वेच्छानिवृत्त.
‘लँग्वेजेस ‘, ‘बियॉंड इंग्लिश कम्युनिकेशन्स’, ‘रचना इमेजेस ‘ इ. कंपन्यांकरता अनुवादक.
लेखन :अनेक मासिकं/दिवाळी अंकांतून कविता /कथा प्रकाशित. ‘नातं ‘, ‘आउटसाइडर, सहज वगैरे ‘, ‘तिसरं पुस्तक ‘हे कथासंग्रह व ‘वादळातील दीपस्तंभ ‘ व ‘मृत्यूवर मात’ ही अनुवादित पुस्तकं प्रकाशित.
पुरस्कार : ‘दिवा प्रतिष्ठान ‘तर्फे 2012-2013चा सर्वोत्कृष्ट लेखिका पुरस्कार. ‘अक्षरधन ‘, ‘प्रबोधन ‘, ‘कवितांगण ‘वगैरेंतर्फे आयोजित काव्यस्पर्धांत बक्षिसं. ‘कथाश्री ‘, ‘सा. सकाळ ‘, ‘ललना ‘वगैरे अंकांतर्फे आयोजित कथा स्पर्धांत बक्षिसं.
☆ कवितेचा उत्सव : कंटिन्युइटी – सौ. गौरी सुभाष गाडेकर☆
दहा बाय दहाच्या घराच्या
एकुलत्या एका खिडकीच्या गजांना
घट्ट पकडून
आकाशाचा टिचभर तुकडा
पाहता पाहता
स्वप्न बघतेय
आकाश कवेत घेण्याचं
जाणते मी
हे अचाट स्वप्न
मनात न मावणारं
जाणते मी
हे अफाट स्वप्न
आवाक्यात न पेलणारं
तरी आस सुटत नाही
या भव्यदिव्य स्वप्नाची
जिवात जीव असेपर्यंत
शेवटचा श्वास घेताना
असेल मन
समाधानाने संपृक्त
की निदान
पाहिले तरी होते एक भव्यदिव्य स्वप्न
कदाचित
त्यानंतर
गर्भवासात
तेच स्वप्न वसत असेल
नवनिर्मित होत असलेल्या
इवल्याश्या डोळ्यांत
आणि
गर्भवासातील
नऊ महिन्यांच्या
तपोबलावर
साकार होईलच ते
पुढच्या जन्मी
नक्कीच.
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
सुस्वागतम् आणि अभिनंदन.