कवितेचा उत्सव
☆ भास आभास ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆
कुठे तुझा भास होई,
आभासाच्या सावलीला..
अन् येतो तुझा आठव,
डोळ्यांमधल्या पाण्याला..?
कधी मला ऐकू येई,
तुझ्या पावलांचा श्वास…
त्या सुखद लयीवर,
जीवा लागे तुझा ध्यास..?
तेवढेच आहे आतां,
अंतरात समाधान…
भिरभिरले आयुष्य
क्षणं सारे दिशाहीन…??
परि नको गुंतू आतां.,
जिथं-तिथं माझ्यासाठी…
पुसले मी डोळे जरा,
केवळ रे….तुझ्यासाठी…?
स्वप्नं असो वा सत्याच्या,
शोधीत जाईन वाटा..
हरवल्या या मनाच्या,
लयीत येतील लाटा….?
तुझ्या-माझ्या स्वप्नातली,
येईल रम्य पहाट…
का तुझ्याच मनातली
ही हवीहवीशी वाट…?
अर्थ देते जगण्याला,
शब्दांच्या गुंफुनी माळा…
अन् तुझा-माझा सूर
कवितेतल्या ओळींना…
कवितेतल्या ओळींला..?
© शुभदा भा.कुलकर्णी
(विभावरी) पुणे.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈