श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ ध्यास असू दे नंदनवन पण… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(वृत्त: वनहरिणी) – मात्रा :८+८+८+८
ध्यास असू दे नंदनवन पण परसामधली बाग फुलू दे
नित्य नभाशी संभाषण पण घरट्याशी संवाद असू दे !
स्वप्नीच्या त्या गंतव्याची दे पांथस्था कोण हमी रे
वळणे वळणे तीर्थस्थाने तीर्थाटन तव धन्य होवु दे !
विझून जाते अंतरज्योती गोठुन जाती झरे आतले
मूर्तिमंत हे मरण टाळण्या एक निखारा उरी जळू दे !
रणांगणी ह्या जखमी जो तो कुणि घालावे कोणा टाके
ही तर गंगा रक्ताश्रूंची ओंजळ तुझीहि विलिन होवु दे !
बरीच पडझड तटबंदीची किती गनीम नि कितीक हल्ले…
तुझ्या गढीवर पण जिवनाचा ध्वज डौलाने नित फडकू दे !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈