श्री उदय गोपीनाथ पोवळे
जीवनरंग
☆ हृदय मिलन – भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
आजचा तिसरा दिवस होता. रजनीला रोज एकाच नंबरवरून फोन येत होता आणि रोज तोच तो…..मी मंगेश पराडकर असे सांगायचा आणि मला तुम्हाला भेटायचे आहे असे सांगून रजनीकडे तिला भेटण्यासाठी वेळ मागायचा.
रजनी मुंबईतली परेल परिसरात राहणारी मध्यमवर्गीय ‘हम दो हमारे दो ‘ अशा चौकोनी घरातली मुलगी. एका वर्षापूर्वी तिचे वडील अल्पशा आजराने गेले आणि घरचा सगळा भार रजनीवर पडला. नुकतीच कॉमर्स शाखेतली पदवी घेऊन एम. बी. ए. करण्याचा विचार करत असणाऱ्या रजनीला आई आणि लहान भावाच्या शिक्षणासाठी कॉलेज सोडून ठाण्यातल्या विवियाना मॉल मध्ये एका साडीच्या दुकानात सेल्स मॅनेजर म्हणून नोकरी करायला भाग पडले. दिसायला साधारण पण हुशार असणाऱ्या रजनीने आधी त्या ओळख ना पाळख अशा मंगेश पराडकरला भेटायला नकारच दिला पण आज जेंव्हा तिसऱ्यांदा त्याचा फोन आला तेंव्हा तिला त्याचे काहीतरी काम असणार ह्याची जाणीव झाली आणि उद्या आपण भेटायची जागा आणि वेळ ठरवू असे सांगून तिने त्याचा सांगून फोन ठेवला.
रजनीकडे मंगेशला भेटायच्या आधी हातात पूर्ण दिवस होता. त्याची काही माहिती मिळावी म्हणून तिने पूर्ण सोशल मिडिया पालथे घातले. मंगेश पराडकर नावाचे जवळ जवळ २० जण तिला फेसबुकवर मिळाले. त्यातला हा मंगेश पराडकर कोण ह्याचा अंदाज घेण्यासाठी त्याचे वय माहित असायला पाहिजे ते ही रजनीकडे नव्हते. रजनीचा तो पूर्ण दिवस आणि रात्र त्या मंगेश पराडकरच्या नावाने बैचैनीत गेली.
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी रजनीला त्याचा फोन आला, “हॅलो…. मी मंगेश…. मंगेश पराडकर. ” अशा नेहमीच्या सुरात त्याने बोलायला सुरवात केली. ” हां बोला ….. मला फक्त अर्धा तास सुट्टी मिळेल. त्यामध्ये आपल्याला भेटता येईल. तुम्ही असे करा ….. मला विवियाना मॉल मध्ये स्टारबक्स मध्ये बरोबर २ वाजता भेटा. मी तेथे येते. ” रजनीने त्याला काही न बोलू देता तिच्यानुसार भेटायचे ठिकाण आणि वेळ ठरविली. त्यानेही त्याला दुजोरा दिला आणि फोन ठेवला.
रजनीने अनोळखी असणाऱ्या त्या मंगेशला भेटायला बोलविण्यासाठी सुरक्षित अशी जागा शोधून तिचा वेळही फुकट जाऊ नये म्हणून लंच टाइममध्ये त्याला बोलाविले होते.
त्याला ओळखायचे कसे हा प्रश्न तिला होताच पण तो स्टारबक्स मध्ये आल्यावर तिला फोन करेलच हयाची तिला खात्री होती.
बरोबर दोन वाजता रजनीने स्टारबक्समध्ये प्रवेश केला आणि एक उंच, देखणा, रुबाबदार, सुटाबुटातला साधारण वयाने २५ ते २८ च्या तरुणाने तो बसलेल्या टेबलावरून उठून तिच्या समोर येत ” हाय रजनी ….. मी … मी मंगेश पराडकर. ” प्रथम तर रजनी त्याच्याकडे बघतच राहिली….. तिच्या तोंडून काही शब्दच फुटेना. कसेबसे तिने त्याला हाय केले आणि त्याने तिला तो बसलेल्या टेबलवर बसायला नेले.
रजनीने भानावर आल्यावर विचार केला, ह्याने मला ओळखले कसे…. रजनीला त्याच्याआधी कधी त्याला भेटलेले किंवा बघितलेले आठवत नव्हते. त्याने त्याच्या खिशातून त्याचे व्हिजीटींग कार्ड तिला दिले आणि रजनीला तिच्या आवडीनुसार कॉफी ऑर्डर देण्यासाठी रिक्वेस्ट केली. रजनीने दोन कॉफी ऑर्डर करून ते व्हिजिटिंग कार्ड वाचायला सुरवात केली. सी इ ओ ऑफ पराडकर अँड पराडकर पॅकेजिंग इंडस्ट्रीज.
रजनीच्या मनात खूपच खळबळ चालू होती. एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीजच्या सी इ ओ चे माझ्याकडे काय काम असेल, का हा सगळा फसवा प्रकार चालू आहे. तिला काहीच कळत नव्हते तरीही तिने त्याचे काय काम आहे ते तरी बघू असे स्वतःलाच समजावून त्याला ” हा …. बोला काय काम काढलेत माझ्याकडे…हो…. त्याच्याआधी मला एक सांगा, आपण ह्या आधी कधी भेटलो आहोत का ….. म्हणजे तुम्ही मला ओळखले कसे.” त्याने हसूनच उत्तर दिले , ” नाही …. आपण आज पहिल्यांदाच भेटत आहोत. गेल्या सहा महिन्यांपासून मला तुम्हांला भेटायचे होते पण तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मला मिळत नव्हता पण खूप प्रयत्न करून, खूप जणांच्या हातापाया पडून तो आत्ता चार दिवसांपूर्वी मिळाल्यावर मी तुम्हाला फोन केला. तसे आत्ता आपण भेटेपर्यंत माझे असे काही खूप महत्वाचे काम नव्हते. फक्त तुम्हांला भेटून मनापासून तुमचे आभार मानायचे होते आणि तुमच्या काही माझ्याकडून अपेक्षा असतील तर, मी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार होतो पण आत्ता तुम्हांला भेटल्यावर माझा विचार बदलला आहे आणि आता माझे तुमच्याकडं खरंच एक काम आहे.’
क्रमश:….
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈