श्री उदय गोपीनाथ पोवळे
जीवनरंग
☆ हृदय मिलन – भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆क्रमश:….
मंगेश जे काही सांगत होता त्यामुळे रजनी विचारात पडली. आधी फक्त आभार मानायचे होते आणि आता खरोखरचे एक काम आहे. जे काही मंगेश सांगत होता ते काही तिला कळत नव्हते. ” हॅलो….. तुम्ही… तुम्ही काय बोलत आहात काही कळत नाही. आपली आधी काहीच ओळख नसतांना तुम्ही माझे का म्हणून आभार मानणार होतात आणि आता भेटल्यावर काय काम आहे? तुम्ही जरा स्पष्ट बोलाल तर बरे होईल माझ्याकडे जास्त वेळ नाही. मला माझ्या ड्युटीवर परत जायला लागणार आहे तरी कृपा करून जे काही असेल ते स्पष्ट सांगून टाका. ” रजनीने लांबड न लावता त्याला स्पष्ट बोलायला सांगितले.
मंगेशने जरा आवंढा घेतला आणि बोलायला सुरवात केली, “तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. मी जरा स्पष्टच बोलतो. माझ्याशी तुम्ही लग्न कराल का ? मी तुम्हाला माझ्याशी लग्न करण्यासाठी मागणी घालत आहे. विचार करा, माझी पूर्ण माहिती काढा आणि नंतरच तुमचा निर्णय कळवा. तुमचा होकार असेल तर मी आणि माझे आई वडील तुमच्या आईला भेटायला येऊन पद्धतशीर मागणी घालू. ” रजनी आता मात्र खरंच गोंधळून गेली होती. काय चाललंय तिला काहीही कळत नव्हते. कोण कुठचा रोज फोन करून भेटायला काय बोलवतो आणि भेटल्यावर कळते की तो मोठा बिझनेसमन आहे आणि आता तर काय डायरेक्ट लग्नाची मागणी.
“हॅलो …. तुम्ही शुद्धीवर आहात ना. काय बोलत आहात? ना आपली ओळख ना पाळख. जरा काय मी आज भेटायला तयार झाले तर डायरेक्ट तुम्ही लग्नाची मागणी घालताय. जरा वास्तवात या. लग्न अशी एका भेटीत ठरत नसतात आणि हो मुख्य म्हणजे माझ्यात असे काय आहे, मी काही सौंदर्यवती नाही, माझी उंची….. शरीराची म्हणा किंवा स्टेटसची म्हणा तुमच्याशी जुळत नाही आणि महत्वाचे म्हणजे काहीतरी वेगळे असे माझ्यात काही नसतांना तुम्ही मलाच का निवडत आहात ?” रजनीचा जो काही तोंडाचा पट्टा चालू झाला त्याला मंगेशनेच लगाम लावला. “अहो …. जरा ऐकून घ्या. मी काही तुमचा निर्णय आत्ता मागत नाही. तुम्ही पूर्ण एक आठवडा घ्या. माझी चौकशी करा. माझ्याबद्दल माहिती काढा. जमल्यास आमच्या ऑफिसला भेट द्या. तुमची तयारी असेल तर मी एक आठवडा रोज येथे २ वाजता येऊन तुमची भेट घेईन. जे काही प्रश्न तुमच्या मनात असतील ते तुम्ही मला विचारत जा. महत्वाचे म्हणजे मी माणूस म्हणून कसा आहे ह्याची तुम्ही पारख करा आणि नंतरच तुमचा काय निर्णय असेल तो सांगा”. मंगेशने रजनीला शांत करून समजावले. रजनीला एक कळून चुकले होते की तो जे काही बोलत होता त्यात कुठेही घाई आणि आक्रस्ताळेपणा नव्हता. त्याने जसा शांतपणे त्याचा निर्णय घेतला आहे तसाच तो तिलाही घ्यायला वेळ देत होता. सगळे ऐकल्यावर रजनीने एक आठवडा रोज दोन वाजता ह्याच ठिकाणी स्टारबक्समध्ये भेटायचे ठरविले.
घरी गेल्यावर तिने त्याची गुगलवरून खूपशी माहिती जमा केली. प्रथम त्याचा गुगलवरील फोटो आणि तो एकच आहे ह्याची खात्री केली. त्यांच्या पराडकर आणि पराडकर कंपनीचे मागील रेकॉर्ड चेक केले. त्यांच्या कंपनीचा खूप मोठा पसारा होता. महत्वाचे त्याच्या वडिलांनी उभा केलेल्या आणि मंगेशने तो वाढविलेल्या साम्राज्याचा तो एकुलता एक वारीस होता. रजनीला अशी एकही गोष्ट मिळत नव्हती त्यामुळे तिने मंगेशला नकार द्यावा. आता फक्त नी फक्त एकच प्रश्न रजनी समोर उभा होता तो म्हणजे मंगेशने काहीही ओळख नसतांना तिची निवड का केली आणि जो माणूस फक्त आभार मानायला आला होता ते पण कशाबद्दल ते न सांगता तडक त्याने एकदम ल्ग्नाचीच मागणी घातली. का? का?
क्रमशः 2 ….
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈