श्री उदय गोपीनाथ पोवळे
जीवनरंग
☆ हृदय मिलन – भाग 3 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
त्याने लग्नाची मागणी घातली खरी. तो सर्व दृष्टीने उत्तम आहे, हेही खरे पण मग ‘मीच का?’ हा मोठा प्रश्न रजनीला झोप लागून देत नव्हता.
ठरल्याप्रमाणे गेला एक आठवडा ते रोज अर्ध्या तासासाठी भेटत होते. तो एकदाही लेट आला नव्हता. रजनी येण्याच्या आधी तो तेथे हजर असायचा. सुरवातीला साधे कपडे आणि तोंडाला हलकासा पावडरचा हात फिरवून कामाला जाणारी रजनी रोज काहीतरी ठेवणीतले कपडे घालून आणि तोंडाला जरा पॉण्डस क्रीम आणि ओठांवर पुसटशी लिपस्टिक फिरवायला लागली. तिच्यातला तो बदल तिच्या आईच्या लक्षात आला होता तसे आईने तिला त्याबद्दल विचारले. तिच्या आयुष्यात जे काही घडत होते त्याबद्दल तिने जसेच्या तसे सर्व तिच्या आईला सांगितले. प्रथम तिच्या आईलाही धक्का बसला आणि तिने त्या मंगेश पराडकरला घरी घेऊन ये असा सल्ला दिला. रजनीने आईची समजूत काढून, ती हे प्रकरण व्यवस्थित हाताळत आहे ह्याची तिला खात्री दिली आणि लवकरच जर तिच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली तर ती आधी मंगेशला तिला भेटायला घेऊन येईल ह्याची ग्वाही दिली.
पूर्ण आठवडा ते दोघे रोज भेटत होते. दोघेही आता एकमेकांशी मन मोकळे होऊन बोलत होते. रजनीने त्याच्या बद्दल काढलेल्या माहितीत काही वावगं असे तिला काहीच मिळाले नाही तर त्याच्या ऑफिसमधला त्याचा स्टाफ त्याला देवमाणूस मानत होते. आज तिला मंगेशला त्याने केलेल्या प्रपोजला उत्तर द्यायचे होते.
बरोबर २ वाजता मंगेशला भेटायला ती स्टारबक्समध्ये आली. मंगेशने आज खूपच आकर्षक सूट परिधान केला होता. तो नेहमी सारखाच हँडसम दिसत होता. ती जाऊन त्याच्या टेबलावर बसली. दोन मिनिट्स दोघेही काही न बोलता एकमेकांकडे बघत होते. आज रजनीनेही तिची केस रचना वेगळी केली होती. तिच्या गालांवर एक वेगळाच ग्लो दिसत होता. आज नेहमीपेक्षा ती खूपच आकर्षक दिसत होती. दोघांमधली शांतता मंगेशनीच मोडली. ” काही बोलणार आहेस का अशीच बसणार आहेस. तुझ्या परीक्षेत मी पास झालो की नाही. आज तू उत्तर देणार आहेस. मी खरंच तुझ्या उत्तरासाठी आतुर आहे. ” रजनी थोडी गंभीर झाली. जेंव्हा ती आली त्यावेळच्या आणि आत्ताच्या तिच्या चेहऱ्यात फरक पडला. थोडा दीर्घ पॉज घेऊन रजनीने बोलायला सुरवात केली. ” मंगेश तुझ्याबद्दल जी मी माहिती काढली त्यामध्ये तू खरंच एक उत्तम माणूस म्हणून पास झाला आहेस. तुझ्यात असे काहीच वाईट नाही की ज्यामुळे तुला मी नकार द्यावा तरीपण आज तुला होकार द्यायची माझी हिम्मत होत नाही आणि त्याला कारण एकच आहे ते म्हणजे तू केलेली माझी निवड. मीच का ? ह्या माझ्या प्रश्नाचे उत्तर तू मला आजपर्यँत दिलेले नाहीस आणि जोपर्यंत मला ह्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तिथपर्यंत माझ्या होकाराची अपेक्षा करू नकोस. जे काही असेल ते खरे सांग आज….. ह्या वेळे नंतर परत तुला कधीच तो चान्स मिळणार नाही. तू निवडलेली मुलगी मीच का ? “
मंगेशही गंभीर झाला. ” रजनी ते मी तुला सांगणारच आहे पण ते सांगण्याचे मी थोडे टाळत होतो पण तुझेही बरोबर आहे. तुझी माझी ओळख नसताना, तुला शोधून काढून, तुला तडक लग्नाची मागणी घालतो. का ? तुलाच का ? हा तुला पडलेला प्रश्न रास्त आहे. त्यासाठी तुला माझ्याबरोबर थोडे भूतकाळात यावे लागेल. गेले वर्षभर मी माझ्या हृदयाच्या दुखण्याने आजारी होतो. खूप स्पेशालिष्ट डॉक्टरांची फौज माझ्यावर उपचार करत होती आणि शेवटी माझ्या हृदयाचे प्रत्यारोपण करणे हा एकच उपाय होता नाहीतर फक्त तीन महिन्यांचे माझे आयुष्य होते. थोड्याच वेळात नवीन हृदय मिळणे तेवढे सोप्पे नव्हते आणि माझ्या आयुष्यात चमत्कार झाला. एका देवीने तो चमत्कार केला. एक अल्पशा आजाराने देवाघरी गेलेल्या तिच्या वडिलांचे हृदय त्या मुलीच्या निर्णयामुळे हृदयदान केले गेले. त्या दानशूर माणसामुळे माझ्या हृदयाचे प्रत्यारोपण झाले. आज जे काही माझे पुढचे आयुष्य माझ्या वाटेला आहे ते मला त्या मुलीच्या म्हणजेच तू… रजनी… तुझ्यासाठी जगायचे आहे. पहिल्या भेटीत मला तुझे फक्त आभार मानायचे होते पण तुला भेटल्यावर तुझा साधेपणा, तुझा खरेपणा, माझे व्हिजिटिंग कार्ड बघून सुद्धा तुला त्याचे काहीच न वाटणे ह्यामुळे मी तडक तुझ्याशी लग्न करायचाच विचार केला. त्या निमित्ताने जिच्यामुळे, जिच्या वडिलांमुळे मला माझे नवीन आयुष्य मिळाले ती कायम माझ्याबरोबर असणार आणि जिने आपल्या सर्वात प्रिय असलेल्या तिच्या वडिलांना गमावले तिला तिच्या वडिलांच्याच हृदयाजवळ रहायला मिळेल ह्या साठीच मी फक्त तुझीच निवड केली पण आता गेला आठवडा तुला रोज भेटून मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. भले माझे आत्ताचे हृदय माझे असले तरी त्यावर पहिला हक्क तुझा आहे. माझ्या हृदयाचा आता तूच सांभाळ कर. कृपया माझा स्विकार कर.”
मंगेशच्या डोळयांत पाणी होते. रजनीला तर गेल्या सहा महिन्यांपूर्वी घडलेले ते हॉस्पिटलमधले दृश्य डोळ्यासमोर आले. जेंव्हा डॉक्टरनी तिला तिचे वडील गेल्याचे सांगितले तेंव्हा त्यांनी तिला त्यांचे ह्रदयदान करण्याविषयी विचारणा केली आणि रजनीने त्याचे महत्व ओळखून त्यांनी दिलेल्या डोनेशन फॉर्मवर सही केली होती. रजनी बसलेल्या जागेवरून उठली आणि तिने मंगेशच्या जवळ जाऊन त्याला मिठी मारली. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओझरत होते. मंगेशच्या उंचीमुळे तिचे डोके मंगेशच्या छातीवर टेकले गेले आणि तिला तिच्या वडिलांच्या हृदयाची स्पंदने ऐकू आली. तिने मान वर केली. वरून मंगेशच्या डोळ्यांतले अश्रू रजनीच्या गालावर पडून दोघांच्या अश्रुंचे मिलन झाले होते.
स्वतःचा स्वार्थ न बघता केलेले कोणते ही दान हे दान करणाऱ्याला काही ना काही चांगलेच देऊन जाते. हे आज परत सिद्ध झाले होते.
समाप्त
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈