सुश्री नीलांबरी शिर्के
कवितेचा उत्सव
☆ दिंडी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
दिंड्या चालल्या चालल्या
पंढरीच्या वाटेवर
वाट पहाते माऊली
उभी तिथे विटेवर
टाळ चिपळ्यांचा नाद
सारा पावित्र्याचा वास
वारकऱ्यांच्या पोटाला
देई माऊलीच घास
मुखी विठ्ठल विठ्ठल
पाय तालावर पडे
डोईवरची तुळस
भेटीलागी मन वेडे
काळ्या ढगातून कधी
विठू झरझर झरे
पंढरीच्या वाटेवर
विठूमय शेतशिवारे
विठ्ठलाचा नामधोष
नीत्य कानावर येतो
वारकऱ्यांच्या वेषात
मज सावळा भेटतो
विठ्ठल विठ्ठल एकनाथ नामदेव तुकाराम 🙌
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈