सौ. अमृता देशपांडे
कवितेचा उत्सव
☆ “तानपुरे लतादिदींचे…” ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
स्पर्श तिच्या अंगुलीचा
आणि तिचा शुद्ध स्वर
झंकारली काया माझी
आणि भारलेला ऊर ll
आठ दशके पाच वर्षे
नाही कधीच अंतर
दीदी तुझ्या सेवेसाठी
आम्ही सदैव तत्पर ll
आज मी हा असा उगी
गोठावलो गवसणीत
माझ्या तारा मिटलेल्या
आणि तुझे सूर शांत ll
तुझे स्वर कानी येता
क्षण क्षण थबकतो
आम्ही तानपुरे तुझे
मूक आसवे ढाळतो ll
कुठे लुप्त झाला सूर
आणि स्पर्श शारदेचा
धन्य जन्म की अमुचा
बोले तानपुरा दीदींचा ll
© सौ. अमृता देशपांडे
पर्वरी – गोवा
9822176170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈