श्री सुहास रघुनाथ पंडित
विविधा
☆ प्रीत बरसते… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
शुभ्र चांदणे शुभ्र चमेली
त्यात आपुली दोन मने
धुंद होऊनी तुझ्या संगती
जाग जागलो कितेक राती
त्या रातींच्या आठवणीनी
फुलतील आणिक नवस्वप्ने
त्यात आपुली दोन मने
कर देता तू माझ्या हाती
स्वर्ग उतरला धरणीवरती
त्या स्वर्गाच्या बागेमधूनी
गात फिरूया प्रीत कवने
त्यात आपुली दोन मने
अशीच राहो शांत निशा ही
समीप आणिक माझ्या तू ही
सुख स्वप्नांच्या नंदनवनी या
प्रीत बरसते,नव्हे चांदणे
त्यात आपुली दोन मने
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈