कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 117 – विजय साहित्य
☆ तो सागरी किनारा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
तो सागरी किनारा…
लग्नाआधी, लग्नानंतर, दोघांनाही
तितकाच जवळचा वाटायचा
जितका सागराला किनारा
अन किनाऱ्याला सागर,
परस्परांना आपलं समजायचा…!
सागरात काय दडलय,
याची प्रचंड उत्सुकता किनाऱ्याला.
सागराला देखील अनावर ओढ
आपल साम्राज्य, किनाऱ्याला बहाल करण्याची.
कधी धीर गंभीर… कधी रौद्र, वादळी,
तर कधी कधी खळाळत, उत्स्फूर्तपणे
सागर धाव घ्यायचा किनाऱ्याकडे.
उसळत्या लाटांचा, मर्दानी जोषात, सागराच येणं
त्याची गाज, बहाल केलेला,
शंखशिंपल्यांचा नजराणा पाहून, किनारा सुखावतो.
असा सालंकृत किनारा, सागराच्या भरतीन
सदा रहायचा आलंकृत, अन् प्रेमांकित देखील.
भरती ओहोटीच्या आपलेपणातून
किनाऱ्याच सुखवस्तूपण बहरायच.
त्याच्या तिच्या नात्याच प्रतिबिंबच लहरायचं
त्या सागर लाटांमधून…!
पतीपत्नीच्या नात्याला कधी कधी
वैचारिक मतभेदान, भरती ओहोटीला
सामोरे जाव लागायच, तेव्हाही…
तो सागर किनाराच द्यायचा आसरा
दोन भरकटलेल्या नावांना…
सांगायचा अनुभवी बोल
”भरती ओहोटी मधला काळ
तोच खरा कसोटीचा
या काळात, एकाने व्हायचं पसा
तर दुसऱ्यानं व्हायचं दाता”. .!
उसळत्या सागराचा,
अन सौदर्यशील किनाऱ्याचा
तो विहंगम भावसंवाद,
परस्परांना ओढ लावायचा
ना ते ना ते म्हणतानाही
भवसागरात जगायला शिकवायचा
नातं जोडून ठेवायचा
तो सागरी किनारा. . . !
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈