सौ. स्वाती रामचंद्र कोरे
कवितेचा उत्सव
☆ स्वरलता पुन्हा बहरावी… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆
आज हिरमुसला वसंत
उरी तयाच्या बोचरी खंत..१
गानकोकिळा अबोल झाली
सुरमयी जादू हरपली..२
विसर पडला मोगऱ्याला
राजी न पाकळी फुलायला..३
स्वरसम्राज्ञी गानकोकिळा
वेड लावी जीवा गोड गळा..४
स्वर जादुई मंतरलेले
अवीट गोडीने भारलेले..५
सप्तसूर ते अजरामर
सदा फुलता गुलमोहर..६
झाले साजरे सुखाचे क्षण
कातरवेळी हलके मन..७
सूर जणू शारदेची वीणा
धून बासरीची छेडी कान्हा..८
सांज सकाळ फुलून आली
सुरांची मैफिल बहरली..९
आठवतात सुरेल गाणी
रुंजी घाली मनी आठवणी..१०
दीदींच्या स्वरांनी जाग यावी
स्वरमोहिनी अवतरावी..११
स्वरलता पुन्हा बहरावी
ईश्वरा मागणी स्वीकारावी..१२
© सौ. स्वाती रामचंद्र कोरे
भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली
मो.9096818972
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈