श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ वाळवंट ☆
ह्या पाकळ्या फुलांच्या गळतात फार लवकर
पण ठेवती जपूनी अनमोल त्यात केशर
रात्रीत फूल झाले कळले कुठे कळीला
नेसून काल होती रंगीत छान परकर
शेतातलाच माझ्या कापूस शुभ्र नेला
तोट्यातलाच सौदा सुनसान जाहले घर
पाषाण हृदय माझे ठरवून लोक गेले
दगडात वाहणारा दिसला कुणा न पाझर
हे वाळवंट झाले माझ्या कधी मनाचे
उडतोय फक्त धुरळा माझ्या इथे मनावर
गावातले जुने घर कौले उडून गेली
भिंतीस तोडुनीया बाहेर येइ दादर
येऊन पूर गेला मी कोरडाच आहे
मातीत पालथी का आहे अजून घागर ?
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈