सौ .कल्पना कुंभार
कवितेचा उत्सव
☆ कोणीतरी माझ्यासाठी ☆ सौ .कल्पना कुंभार ☆
कोणीतरी कोणासाठी
पाठीशी उभं असतं..
जे पडताना सावरतं
चुकताना आवरतं..
नात्याच ना गोत्याच
पण काहीतरी देऊन जातं
‘आयुष्य हे एकदाच मिळतं’
हे सहज शिकवून जातं..
डोळ्यांतली आसवं
सहज ते पुसून जातं..
“दृष्टी बदलून बघ जगाकडे”
जगण्याचा धडा गिरवून घेतं..
कोण असतं ते कोणीतरी??
कधी वडील कधी आई
कधी शाळेतल्या बाई..
पाठीवर हात ठेविता
जग जिंकल्याची उर्मी येई..
कधी भाऊ कधी बहीण
कधी मित्र कधी मैत्रीण
कधी निसर्ग कधी प्राणी
कधी अनोळखी कोणी
तर कधी ओळख जुनी..
आयुष्याच्या वाटेवर
माझ्यासाठी…कोणीतरी..
💞मनकल्प 💞
© सौ .कल्पना कुंभार
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈