श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ निसर्ग… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
(मुरबाड येथील वसंतोत्सव कार्यक्रमांतर्गत काव्यलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झालेली श्री.रविंद्र सोनवणी यांची कविता अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी देत आहोत. श्री.सोनवणी यांचे पुनःश्च अभिनंदन.)
वर अथांग आभाळ, त्याचे उजळले भाळ
पहाटेच्या मागे मागे, आली रांगत सकाळ
कंठ कोंबड्याला फुटे, फुटे फांदीला पालवी
मंद सुगंधित वारा, पाना फुलांना जोजवी
रंग केशरी सोनेरी, केला धरेला बहाल
कुठे झऱ्यातले गीत, कुठे नदीचा तराना
गाय हंबरे गोठ्यात, तिला आवरेना पान्हा
जाग पाखरांना आली, चाले पिलांचा कल्लोळ
चूल जागे निखाऱ्यात, तिला घालता फुंकर
तवा तापला तापला, टाका लवकर भाकर
चरा चराला लागलं, रामप्रहराचं खूळ
नाद घुंगरांचा घुमे, बैल चालले रानात
सुगी फुलते डुलते, भूमी पुताच्या डोळ्यात
पारिजातकाची पहा, चाले दवात आंघोळ
एकतारीवर गातो, कुणी अनामिक भाट
पैंजणांच्या चाहुलीला, पहा आसुसला घाट
भरे आनंदाचा डोह, त्याचा सापडेना तळ
इथे अवती भवती, अशी फुले बागशाही
चिंब सुगंधात न्हाल्या, झाल्या ओल्या दिशा दाही
अशी सकाळ साजरी, तिचं रुपडं वेल्हाळ ।।
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈