सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ वर्षारंभ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

वसंत ऋतुच्या आगमने

शक संवत्सर सुरू होते

मरगळ झटकून सारी

निसर्गात चैतन्य फुलते ||

 

वर्षारंभी नवलाई होते

निसर्ग किमया बहरते

पानगळीच्या जागेवरती

नवी पालवी नाचू लागते ||

 

पळस पांगारा बहव्याला

गुलमोहरा येई फुलोरा

निसर्गाची रंगपंचमी ही

अदभूत रंगीत नजारा ||

 

मोगऱ्याचा गंध धुंदावतो

सुटे आंब्याचा घमघमाट

सजे चैत्रागौरीची आरास

आंब्याची डाळ पन्ह्याचा थाट ||

 

ठायी ठायी रंगांची आरास

फळा फुलांना बहर भारी

सृजनोत्सवाने सुरू होई

नववर्षाची नवी भरारी ||

 

दु:खावरती माती सारत

आनंदाचे ते बीजारोपण

नवीन स्वप्ने नवीन आशा

घेऊन येतील नवे शुभ क्षण ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments