☆ कवितेचा उत्सव : नवोदित कवी – सुश्री मानसी चिटणीस ☆
स्वप्ने रंगवत
लिहित जायचा काहीबाही
नकारघंटा जरी मिळाली
मिरवायचा कवितेची द्वाही…
एका दिवशी कुणी अचानक
फोन करुनिया सांगे त्याला
म्हणे तुम्हाला अमका तमका
पुरस्कार तो जाहिर झाला..
कवी नाचला आनंदाने
दोन चार मग लिहिली कवने
फोनवरील तो कोणी त्राता
मखलाशीने बोलत होता…
नसेच काही दुजी अपेक्षा
केवळ रक्कम द्या इतकी
पुरस्कार ही तुम्हास देऊ
देणगी द्या मागू जितकी
साटलोटं सौदेबाजी
सत्काराची फुलं ताजी
कवी नवोदित पाही स्वप्ने
कवितेशी हो कसले घेणे
कसा कवीअन् कसली कविता
केवळ द्यावे अन् घ्यावे
बाजारातल्या एजंटांनी
नवेच बकरे शोधत -हावे …
© सुश्री मानसी चिटणीस
पुरस्कारांचा काळा बाजार उघडा पाडलात.मस्तच.