श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ दुरावा ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
काळ नाही थांबणारा सारखा तो चालतो
वाटत्याची कोणती हे तो कुणाला सांगतो
माणसाला माणसाचा भरवसा आहे कुठे
संशयाने ग्रासलेल्या जिवलगा शी भांडतो
ग्रासलेला संभ्रमाने खेळ तेव्हा थांबतो
जिंकलेला डाव जेव्हा जिंकणारा हारतो
बेगडी प्रेमात होती गुंतली काही मने
हाल झाले काय त्यांचे हे जमाना पाहतो
का मला निक्षून काही बोलशी तू हे प्रिये
हा तुझा आवाज नाही आतला मी जाणतो
मागताना न्याय थोडा संकटानी घेरले
कोणता आहे पुरावा सांग येथे जाचतो
मांडला छळवाद आहे वास्तवाने सारखा
मी भविष्यालाच आता रोज माझ्या पाहतो
या फुलांचा त्या फुलांचा रंग आहे वेगळा
एकतेचा हार गुंफू दाखवाया लागतो
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈