श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ भाग्यवंत… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
वृत्त: आनंदकंद
(गागाल गालगागा)×२
व्हावी क्षणास माझ्या, बाधा निळी अनंत
ओंजळ कृतार्थ व्हावी,आयुष्य भाग्यवंत !
कंठात दाटलेला,हा हुंदका कुणाचा?
भिडती अजून ह्रदयी, उद्ध्वस्त ते दिशान्त !
पंखांस ज्ञात माझ्या ,त्यांचा किती अवाका
स्वप्नी भल्या पहाटे, चळवी तरी दिगंत !…
तिमिरास तिमिर घेतो, कवटाळुनी उराशी
होतो जरा जरासा, काळोख तेजवंत !…..
रानात दाटलेली,हिमरात्र आरपार….
सूर्योदयात एका, फुलतो कधी वसंत !
लावण्य जीवनाचे, भोगून घे उदंड…
प्रेतास काय साजे, शृंगार शोभिवंत !
अंतागणीक माझ्या,मी जन्मतो नव्याने
आरंभ हा नवा अन् आता नवीन अंत !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈