श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ सुज्ञ कातळ ☆
वंचितांसाठीच तळमळ पाहिजे
अंतरीचा बुद्ध प्रेमळ पाहिजे
ज्या गळाला लागते ही मासळी
जाहला तो रेशमी गळ पाहिजे
माणसांच्या गोठल्या संवेदना
वाटली शस्त्रास हळहळ पाहिजे
लष्कराच्या छावण्या येथे नको
साधुसंतांचीच वरदळ पाहिजे
चिंतनी एकाग्रता इतकी हवी
साधनेने गाठला तळ पाहिजे
कुंपनाने फस्त केले शेत तर
साक्ष देण्या एक बाभळ पाहिजे
नम्र हातातून घडतो देवही
त्याचसाठी सुज्ञ कातळ पाहिजे
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈