श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 109 – एकटं एकटं वाटतं हल्ली…! ☆
एकटं एकटं वाटतं हल्ली कातरवेळी.
ओठावरती त्याच ओळी त्याच वेळी…!
तिची सोबत तिची आठवण बरेच काही
मांडून बसतो सारा पसारा अशाच वेळी…!
उडून जातो सूर्य नभीचा डोळ्यादेखत
तेव्हाच येते रात्र नभावर चंद्राळलेली…!
दाटून येतो अंधार थोडा चहू दिशानी.
अताशा मग फाटत जाते स्वप्नांची झोळी…!
डोळ्यांमधूनी वाहून जाते मग टिपूर चांदणे
बघता बघता मग रात्र ही सरते एकांत वेळी…!
एकटं एकटं वाटतं हल्ली कातरवेळी
ओठावरती त्याच ओळी त्याच वेळी…!
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈