श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ अन् माझिया मनात… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
सखी ग नको विचारू का आज धुंद मी ते
दिसता शशी नभात का रातराणी फुलते
मनी ध्यास एक होता त्यानी मला बघावे
पण पाहता तयांनी लाजून लाल झाले
नयनात होती त्यांच्या भाषा अशी निराळी
कळली मला उगीच,का हासले मी गाली
कधी शब्द नाही वदले पण भाव जाणती ते
बघता तयास दुरूनी मन सैरभैर धावे
मज लागलीसे ओढ त्या दिव्य मिलनाची
होईन काय सखये अर्धांगी मी तयांची
येऊनिया समीप हलकेच स्पर्शतील
अन् माझिया मनात मग चांदणे फुलेल.
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈