सौ राधिका भांडारकर
कवितेचा उत्सव
☆ सोंगट्या… ☆ सौ राधिका भांडारकर ☆
आखले एक रिंगण
त्यातच तिचे अंगण
जन्माने दिले आंदण
बोचरे काटेरी कुंपण
सातच्या आत घरात
पाऊल हवे ऊंबरठ्यात
गरीब बिचार्या चिमणीला
सगळे टपले छळण्याला
शाळेत कविता पाठ केली
तेव्हांपासून मनात रुजवली
रांधा वाढा ऊष्टी काढा
सुरवातीपासून गिरवला पाढा
म्हणे तिची प्रगती झाली
चौकट मोडून बाहेर आली
कुठे गवसले मोकळे आभाळ
कधी येणार सुंदर सकाळ
ओलांडल्या मर्यादेच्या रेघोट्या
पण अडीच घरात फिरतात सोंगट्या
अजुनही चेकमेट झालीच नाही
लक्ष्मणाने रेषा पुसलीच नाही..
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈