श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रेम… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे  

प्रेम द्यावे प्रेम घ्यावे

धन्य देणारा घेणारा

प्रेम प्रवाह अथांग

ऐलपैल सांधणारा !

 

मोत्यापवळ्यांचा जणू

प्रेम पाऊस अंगणी

ओलाचिंब भाग्यवंत

लाखातून एक कोणी !

 

नौका शापीत जीवन

प्रेम दर्याचा किनारा

काळोखात दीपस्तंभ

प्रेम ध्रुवाचा इशारा !

 

प्रेम मृत्युंजय श्रद्धा

प्रेम चंदेरी कहाणी

दोन क्षणांचे जीवन

प्रेम दिक्कालाची लेणी !

 

प्रेम जीवनाचे मर्म

प्रेम रेशमाची वीण

दुनियेच्या बाजारात

प्रेम ओळखीची खूण !

 

प्रेम दिलासा अश्रूंचा

प्रेम वाळूरणी झरा

जीवनाच्या मातीतला

प्रेम कोहिनूर हिरा !

 

प्रेम शीतल चंद्रम

प्रेम उरीचा निखारा

जेथे याज्ञिक आहुती

प्रेम एक यज्ञ न्यारा !

 

प्रेम विधात्याचा ठेवा

प्राणपणाने जपावा

गाभाऱ्यात नंदादीप

नित्य तेवत ठेवावा !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments