सुश्री सुमन किराणे
कवितेचा उत्सव
☆ पिलं गेली दूर दूर… ☆ सुश्री सुमन किराणे ☆
पिलं इवली इवली
घरट्यात झाडावर
आणि घरट्याचा सारा
भार दोन फांद्यावर
पर्ण नक्षीच्या पदरी
मिळे जीवाना उबारा
झुलवितो झुल्यामध्ये
ममतेचा मंद वारा
पाजवूनी गोड रस
भार वाहिला मायेनं
कुशी हिरव्या फांद्यांच्या
जीव वाढती जोमानं
पंख फुटता सुंदर
फांद्या लागती हसाया
पिला वाढविण्यासाठी
किती झिजविली काया
येता बळ पंखामध्ये
सारी निघाली उडून
आणि बिचारं घरटं
कसं झालं सुनं सुनं
फांद्या वाकल्यात आता
एक मेकांचा आधार
शोधे बारीक नजर
पिलं गेली दूर-दूर
© सुश्री सुमन किराणे
पत्ता – मु.पो. हेर्ले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर.
मोबा.9850092676
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अति सुन्दर मार्मिक अभिव्यक्ति बधाई