कवितेचा उत्सव
☆ नदीचे गाणे… ☆ वि.म.कुलकर्णी (विनायक महादेव कुलकर्णी) ☆
वि.म.कुलकर्णी. (स्मृतीदिन) – (ऑक्टोबर ७, इ.स. १९१७ – मे १३, २०१०)
नदीचे गाणे
दरीदरीतुन,वनावनातुन
झुळझुळ मी वाहत येते,
मी मंजुळ गाणे गाते,
मी पुढेच धावत जाते.
वसली गावे तीरावरती,
त्यांना भेटून जाते पुढती,
लतावृक्ष किती काठावरती,
भूमितूनी जे मला भेटती.
फुलवेली मज सुमने देती,
कुठे लव्हाळी खेळत बसती,
कुठे आम्रतरू माझ्यावरती,
शीतल अपुली छाया धरती.
पाणी पिऊनी पक्षी जाती,
घट भरूनी कोणी जल नेती,
गुरे -वासरे जवळी येती,
मुले खेळती लाटांवरती.
मी कोणाची–मी सर्वांची
बांधुनिही मज नेणा-यांची!
जेथे जाईन- तेथे फुलवीन,
बाग मनोहर आनंदाची.
– वि.म.कुलकर्णी (विनायक महादेव कुलकर्णी)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈