श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ दूर गेल्या सावल्या ☆
घेउनी छन्नी हतोडा फक्त खपल्या काढल्या
ये जरा बाहेर म्हटले ईश्वराला आतल्या
राम वनवासात होता भोग हे चुकले कुणा
दाखवीतो तोच जखमा त्याच वनवासातल्या
ओळखीचे झाड काही ताठ फांद्या त्यातल्या
लागले फांदीस ज्या फळ त्याच होत्या वाकल्या
वयपरत्वे होत नाही सहन सूर्याच्या झळा
पाहुनी माझी अवस्था दूर गेल्या सावल्या
त्यागताना फूल होई वेदना काट्यासही
आंगठ्याला ठेच आणिक पापण्या ओलावल्या
टाकले देऊन सारे आणि झालो मोकळा
कागदावरच्या सह्याही आज मजवर हासल्या
चिरतरुण हे क्षितिज कायम आठवांची रात्र ती
तळपणाऱ्या चांदण्यांही उंच होत्या टांगल्या
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈