श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ कधी होता उचंबळ… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
कधी होता उचंबळ
आता एक उपचार
कधी होती कृतज्ञता
आता कोरडे आभार!
दहा पाहुण्यांचा दंगा
मूठभर एका घरी
ऐसपैस झाले घर
आतिथ्यास हद्दपारी!
पडे विसर भुंग्यांना
जातिवंत कुसुमांचा
फुलांभोवती कागदी
गुंजारव आता त्यांचा!
गरुडाच्या पंखांतील
गेले आटून उधाण
म्हणे भरारीस आता
कुठे पूर्वीचे गगन!
उपनद्या ,प्रवाहांचे
आटलेले सारे पाणी
गंगौघाच्या कंठी आता
खळखळाटाची गाणी!
आतड्याला नाही पीळ
काळजाला कळ नाही
झेललेला कोणी येथे
कोणासाठी वार नाही!
तिह्राईत गल्ल्या बोळ
आटलेला गावपणा
माझ्या गावी मीच आता
एक नकोसा पाहुणा !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈