श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
कवितेचा उत्सव
☆ भोंगे… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
पाहून रंगबिरंगी भोंगे
मन अशांत झाले माझे
जशी मागणी तसे रंग
दुकानदार हे मज सांगे
हिरवा तो मशिदीचा
अजान त्यातून वाजे
केशरी तो मंदिराचा
चाळीसा हनुमान गाजे
मी विचारले हळूच मग
हिरव्यातून चालीसा
अन् भगव्यातून अजान
वाजत नाही काहो दादा
म्हणे तो रंगात नसते काही
भोंग्या चे तत्व समजून घेई
प्रामाणिक तो असे ध्वनिला
बदलन्या रंग तो माणूस नाही
देऊ तुम्हास कोणता भोंगा
दुकानदार मज विचारे भाऊ
केसरी की हिरवा ते सांगा
की लाल निळा रंगवून देऊ
म्हणालो मी दे मज भोंगा
बिन रंगाचा जो कुठेही साजे
ज्यातून फक्त नी फक्त
जन गण मन हेच वाजे
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈