सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ जीवन… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
जीवन आहे नितांत सुंदर ध्यान असू दे जगताना
विसरुन जा तू गत दुःखांना नको खिन्नता हसताना
आयुष्याच्या वाटेवरती वळणे असली फार जरी
त्या वळणांवर हसत रहावे सुखदुःखांना बघताना
माहेराचे अंगण सोडुन लेक निघाली सासरला
कष्टी झाले मन आईचे निरोप तिजला देताना
चुकला नाही वनवासही जो रामाला अन् सीतेला
प्राक्तनात जे लिहिले आहे ते बघते मी घडताना
संसाराची दोनच चाके आपण दोघे समजावे
सुखदुःखांना सोबत घेऊ संसारातच रमताना
चंदन झिजुनी गंध पसरतो वार्यासोबत सभोवती
संसाराचा गाडा उपसत आई बघते झिजताना
नाही केव्हा विचार आला छंद स्वतःचे जपण्याचा
कायम तत्पर दुसर्यासाठी अनेक कामे करताना
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈