श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ यावी सर हलकीच आता… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
ग्रीष्मामधले नको निखारे,नको उन्हाचा भाता
यावी सर हलकीच आता
कृष्णघनांची व्हावी गर्दी यावे थेंब टपोरे
माळावरूनी फिरून यावे मृद्गंधाचे वारे
बघता बघता चिंब भिजावा अवघा डोंगरमाथा
यावी सर हलकीच आता
फडफडणारे पंख भिजावे,तुषार पानोपानी
आसुसलेले गवत नहावे पिवळ्या कुरणामधूनी
दूर दिसावी माळ खगांची नभात उडता उडता
यावी सर हलकीच आता
रंगमंच हा सहज फिरावा क्षणात दुसरा यावा
कुंचल्यातूनी जलधारांच्या अवघा ग्रीष्म पुसावा
नूर मनाचा बदलून जावा वसंत सरता सरता
यावी सर हलकीच आता
ग्रीष्मामधले नको निखारे नको उन्हाचा भाता
यावी सर हलकीच आता.
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूप छान