श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ कुंपण माणुसकीचे ☆
माती, लाकुड, कौलाने घर शांत राखले
सिमेंट, वाळू, लोखंडाने खूप तापले
दोन फुटांच्या भिंतींचे घर जरी कालचे
वीतभराच्या भिंतीवर येऊन ठेपले
सारवलेली छान ओसरी स्वच्छ घोंगडे
खांद्यावरचा नांगर ठेवत अंग टेकले
घराभोवती होते कुंपण माणुसकीचे
काटेरी तारांचे कुंपण मात्र टोचले
पान सुपारी सोबत चालू होत्या गप्पा
पारावरती जमले होते लोक थोरले
हायजीनची उगाच पात्रे हवी कशाला
केळीच्या पानात जेवणे खूप चांगले
पाश्चात्त्यांच्या संस्कृतीचे गुलाम झालो
प्राचीन संस्कृतीचे आम्ही पंख छाटले
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈