☆ कवितेचा उत्सव : माझी कविता .. – श्री प्रकाश लावंड ☆
हिरवाई लेवून येते वनराई होऊन येते
कृतार्थ माझी कविता उतराई होऊन येते
अंतऱ्यात लपेटून येते अस्ताई होऊन येते
आईच्या ओठांवरती अंगाई होऊन येते
उधाणल्या दर्यावरती नौका होऊन येते
लाटांची उंची घेऊन गहराई होऊन येते
शेत शिवार फुलवित पिकांतून डोलत येते
पोटाची भूक शमविण्या काळीआई होऊन येते
घायाळ हरिणी होऊन भयभीत धपापत येते
गरुडझेप घेऊन कधी उंचाई तोलून येते
अंधारात झडपली जाते छिन्न होऊन पडते
न्यायाच्या प्रतिक्षेत अटळ दिरंगाई होऊन पडते
© श्री प्रकाश लावंड
करमाळा जि.सोलापूर.
मोबा 9021497977
अच्छी रचना
सुंदर कविता!!!